नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याने गळफास लावून घेत आत्महत्येचा केला प्रयत्न
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने गळफास लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुनील भानुदास बोरसे (शिक्षा बंदी क्र.१२८१०) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या संशयित कैद्याचे नाव आहे. बोरसे हा कैदी पारोळा पोलीस ठाणे अतंर्गत दाखल गुह्यात गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास येताच तुरूंग कर्मचा-यांनी वेळीच धाव घेतल्याने तो बालंबाल बचावला आहे. कारागृहातील मंडळ नं.७ मधील बॅरेक नं.७ मध्ये असतांना त्याने मंगळवारी जिन्याने शौचालयाच्या छतावर जावून आत्महत्येचा प्रयत्न केला. चादर फाडून त्याने आत्महत्येसाठी दोरी बनविली होती. ही दोरी त्याने बॅरेकच्या खिडकीस बांधून गळफास लावून घेतला मात्र तरूंग कर्मचा-यांनी वेळीच धाव घेतल्याने तो बालंबाल बचावला असून कारागृह अधिक्षकांनी याबाबत लेखी रिपोर्ट पोलीसांना दिला आहे. याप्रकरणी कारागृह कर्मचारी शेख युनूस शेख सांडू यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोळे करीत आहेत.
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणा-या ३० वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विकास रमेश जगताप (रा.संत जलाराम मार्केट सोसा.गंगापूर लिंकरोड) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. विकास जगताप याने मंगळवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक गणेश हिंडे करीत आहेत.