नाशिक – मुंबई नाका पोलिस ठाण्यातील दोघा पोलिस शिपायांना लाकडी दांड्याने एकाने मारहाण केल्याची घटना घडली. विकास मुकेश लाखे (रा. डि –९ बिल्डिंगच्या शेजारी, रेणूका नगर, वडाळानाका) असे संशयिताचे नाव आहे. या घटनेनंतर लाखे हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस हवालदार मदन यशवंत बेंडकुळे व पोलिस शिपाई नवनाथ उगले हे दोघेही मुंबई नाका पोलिस ठाण्यात नेमणूकीस आहे. रविवारी कर्तव्यावर असताना पहाटे १.३६ वाजता त्यांना डेल्टा मोबाईलवर कॉल आला. त्यानुसार ते वडाळा नाका परिसरातील रेणूका नगर येथे पोहोचले. तेथे पोलिस शिपाई उगले हे झालेल्या घटनेची माहिती ‘एमडीटी’ वर भरत असताना संशयिताने झटापट करून खेचून नेण्याचा प्रयत्न केला. हवालदार बेंडकुळे व शिपाई उगले यांनी त्यास अटकाव केला असता लाखे याने लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन लाखे हा पळून गेला. हवालदार बेंडकुळे यांच्या तक्रारीन्वये मुंबई नाका पोलिसांनी लाखेविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि कायदा कलम ३५३, ३३२, ५०४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.