नाशिक – पुणे मार्गावरील शिंदे टोलनाक्याजवळ ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कारमध्ये आढळला
नाशिक – नाशिक – पुणे मार्गावरील शिंदे टोलनाक्याजवळ ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कारमध्ये आढळून आला. अलोक अरूण आमले (रा.ड्रीम गणेशा सोसायटी,म्हसरूळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आमले पुणे येथे नोकरीस होते. कुटुंबियास भेटून रविवारी सकाळी ते आपल्या कारमधून परतीच्या प्रवासास लागले असता ही घटना घडली. सकाळी ६ वाजता घराबेहार पडलेल्या आमले यांचा मृतदेह नऊ वाजता शिंदे टोलनाका नजीकच्या तुळजाभवानी लॉन्स समोर कारच्या पाठीमागील सिटावर आढळून आला. कुटूंबियांनी धाव घेतल्याने हा प्रकार समोर आला असून प्रवासात छातीत दुखून आल्याने ते पाठीमागील आसनावर बसले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी त्यांचे मामसासरे दिपक सहाणे (रा.दिंडोरीरोड) यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार ढगे करीत आहेत.
२२ वर्षीय युवकाने गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : २२ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे भागात ही घटना घडली. अणू जितेंद्र वर्मा (रा.म्हाडा कॉलनी,चुंचाळे) असे मृत तरूणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वर्मा याने शनिवारी रात्री आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये अज्ञात कारणातून लोखंडी पोलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक देशमुख करीत आहेत.