चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेले
नाशिक : बेळगाव ढगा भागात फार्म हाऊसचे तार कंपाऊंड तोडून चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी विनोद सुमत पारेख (रा.बेळगाव ढगा) यांनी तक्रार दाखल केली आहे. पारेख यांचे बेळगाव ढगा शिवारात फार्म हाऊस आहे. अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी फार्म हाऊसला असलेले तार कंपाऊड तोडून चंदनाच्या झाडाचा गाभा कापून नेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक झोले करीत आहेत.
दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून नेला
नाशिक : अमृतधाम भागात मोबाईलवर बोलत शतपावली करणा-या तरूणाच्या हातातील फोन दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी प्रज्वल सुनिल पाटील (१९ रा.गंगोत्री विहार,अमृतधाम) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रज्वल शुक्रवारी सायंकाळी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडला होता. महावितरण कार्यालयासमोर असलेल्या जॉगिंग ट्रॅक परिसरात तो फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. मोबाईलवर बोलत तो चक्कर मारत असतांना पाठीमागून सिबीझेड दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.