नाशिक : सिटी सेंटर मॉल भागात कारमधील लॅपटॉप चोरट्यांनी केली बॅग लंपास
नाशिक : सिटी सेंटर मॉल भागात कारमधील लॅपटॉप बॅग लंपास केली आहे. या बॅगेत टॅब,आयफोन आणि महत्वाची कागदपत्र असा सुमारे ३५ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप प्रल्हाद गाडे (रा.जाचक नगर,जयभवानीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गाडे बुधवारी (दि.२०) सिनेमा बघण्यासाठी सिटीसेंटर मॉल भागात आले होते. पिक्चरची तिकीट काढण्यासाठी ते गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारचालकाची नजर चुकवून लॅपटॉप बॅग चोरून नेली. त्यात ३५ हजार रूपयांचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.
चोरट्यांनी महागडे मोबाईल केले लंपास
नाशिक : धात्रकफाटा भागात उघड्या घरात शिरून चोरट्यांनी तिघा मित्रांचे महागडे मोबाईल लंपास केले आहे. ही घटना गेल्या बुधवारी रात्री घडली. नारायण रामदास पाटील (रा.अरिहंत अपा.सरस्वतीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील व त्यांचे तीन मित्र एकत्रीत राहतात. अज्ञात चोरट्याने उघड्या घरात शिरून सुमारे ५७ हजार रूपये किमतीचे चार मोबाईल चोरून नेले. अधिक तपास जमादार वाढवणे करीत आहेत.
मोबाईल हिसकावून दुचाकीस्वारांनी केला पोबारा
नाशिक : सातपूर येथील औद्योगीक वसाहतीत रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीस्वारांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र मांगू सोनवणे (रा.जाधव संकुल,चुंचाळे शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे गेल्या शनिवारी (दि.२) औद्योगीक वसाहतीतील महिंद्रा सर्कल भागातून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. मोबाईलवर बोलत जात असतांना पाठीमागून आलेल्या एमएच १५ ईजे ६१०१ या दुचाकीवर त्रिकुटापैकी एकाने त्यांच्या हातातील सुमारे २२ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.