मोबाईल चोरी केल्याच्या संशयातून टोळक्याने केली बेदम मारहाण
नाशिक : पेठफाटा भागात मोबाईल चोरी केल्याच्या संशयातून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाने चॉपरचा वार केल्याने तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी सागर कांतीलाल कुवर (२९ रा.अक्षरधाम सोसा.गुलाब बाग समोर,पेठफाटा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. संकेत शेटे, अभिमान सानप, ए.बी.गुंजाळ व त्यांचा एक साथीदार असे तरूणास मारहाण करणा-या टोळक्याची नावे आहेत. कुवर बुधवारी दुपारच्या सुमारास परिसरातील अॅक्सिस बँक भागात उभा असतांना ही घटना घडली. संशयितांनी त्यास गाठून तू मोबाईल चोरला आहे. पूर्वी पण तू चोरी केली होती. आता पुन्हा चो-या सुरू केल्या काय अशी कुरापत काढून त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत टोळक्याने जीवे मारण्याची धमकी देत एका संशयिताने तरूणावर चौपरने वार केल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गावीत करीत आहेत.
कंपनी सुपरवायझरला बेदम मारहाण
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील आयमा ऑफिस भागात कामावरून बोलल्याच्या रागातून कामगाराने आपल्या साथीदारांकरवी कंपनी सुपरवायझरला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने परप्रांतीय सुपरवायझर जखमी झाला आहे. रोशन गुजर व त्याचे दोन साथीदार अशी सुपरवायझरला मारहाण करणा-या त्रिकुटाचे नाव आहे. याप्रकरणी उमेश कुमार पटेल (२९ मुळ रा.उत्तरप्रदेश हल्ली दत्तनगर,अंबड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पटेल औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यात सुपरवायझर आहेत. सागर गुजर नामक कामगारास ते कामावरून बोलल्याने ही घटना घडली. गुजर याने कामाच्या ठिकाणी सुपरवायझरकडून आपला छळ होत असल्याचे सांगितल्याने संतप्त संशयित भावाने हे कृत्य केले. भावास त्रास देत असल्याच्या रागातून संशयित रोशन गुंजाळ याने गेल्या शनिवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या दोन साथीदारांना सोबत घेवून आयमा ऑफिस नजीकच्या शिवकृपा हॉटेल समोर दबा धरला. यावेळी कामावरून घराकडे जाणा-या सुपरवायझरची वाट अडवित त्यास शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.