नाशिक – मेडिकल कॉलेज समोरील ब्रिजवर दुभाजकावर आदळल्याने ६० वर्षीय दुचाकीस्वार ठार
नाशिक – मेडिकल कॉलेज समोरील ब्रिजवर प्रवास करीत असतांना दुभाजकावर आदळल्याने ६० वर्षीय दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. दत्तू धोंडीबा माळी (६० रा.नांदूरगाव पो.माडसांगवी) असे अपघातात ठार झालेल्या वृध्द दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. माळी बुधवारी आपल्या दुचाकीवर ओझरकडून नाशिकच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. आडगाव येथील उड्डाणपुलावर भरधाव दुचाकी दुभाजकावर जावून आदळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. १०८ अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. राम पवार यांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहे.
शहरात वेगवेगळ्या भागात दोन आत्महत्या
नाशिक : शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोन जणांनी बुधवारी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आत्महत्या करणा-या दोघांमध्ये एका ६० वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड व इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिडकोतील ज्ञानेश्वर मुरलीधर ननावरे (४५ रा.त्रिमुर्ती चौक) यांनी बुधवारी घरी कोणी नसतांना अज्ञात कारणातून छताच्या पाईपाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. दुसरी घटना इंदिरानगर भागात घडली. रामचंद्र फकिरा मोरे (६० रा.चिराग प्लाझा,शिवओम हॉस्पिटल शेजारी परबनगर) यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार हादगे करीत आहेत.