नाशिक : अंबड औद्योगीक वसाहतीतील साईग्राम चौकात उधारीचे पैसे देत नाही या कारणातून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याच्या घटनेत एक जण जखमी झाला आहे. या मारहाणीत लोखंडी गजाचा वापर करुन कारची काच फोडण्यात आली आहे. दत्तू कवडे व दिगंबर कवडे (रा.दोघे साईबाबानगर,सिडको) असे तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी वसिम महेबुब शेख (रा.पाथर्डी फाटा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. शेख रविवारी साईग्राम चौकातील फ्लोअरा टाऊन बिल्डींग समोर खाद्यपदार्थाच्या गाडीवर नाष्टा करीत असतांना ही घटना घडली. दोघांनी त्यास गाठून आमचे उधारीचे पैसे देत नाही आणि अंडाभुर्जी खातो असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी शेख याने पैसे दिले गेले असल्याचे सांगितल्याने संतप्त दोघांनी त्यास लाथाबुक्यांनी व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. याघटनेत शेख याच्या कारची मागील काच फोडून नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.