नाशिक : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळय़ातील दागिणे दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याच्या दोन घटना मंगळवारी घडल्या आहे. याप्रकरणी आडगाव आणि उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवघ्या काही तासाच्या अंतराने या घटना घडल्या आहे. पहिली घटना जेलरोड भागात घडली. रेखा रोहिणीरंजन विश्वास (८५ रा.श्रीनिकेतन बंगला,ब्रम्हगिरी सोसा.जलाराम किराणा लेन) या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावर बसलेल्या असतांना हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांना गेट जवळ बोलावून घेत गळय़ातील ५५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी खेचून नेली. याप्रकरणी प्रदिप विश्वास यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत. तर दुस-या घटनेत अनिता सुर्यकांत मुळे (७४ रा.अमृतकुंज बंगला,बलरामनगर धात्रकफाटा) या वृध्दा उकाड्यामुळे मंगळवारी दुपारच्या सुमारास आपल्या घराबाहेरील झाडाखाली उभ्या असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. याप्रकरणी सारिका मुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.