शहरातील तीन दुकाने फोडली
नाशिक : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गेल्या मंगळवारी (दि.१४) रात्री वेगवेगळय़ा भागातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी गल्यातील रोकडसह वस्तूंवर डल्ला मारला. या घटनेत सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळविला असून याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजेंद्र विष्णू बारगजे (रा.साईनगर,अमृतधाम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे अमृतधाम परिसरातील सिध्देश्वर नगर येथील त्रिकोणी बंगला भागात अंबिका पार्क नावाचे किराणा दुकान आहे. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बारगजे व शेजारी राहूल देवरे यांचे न्यु मातोश्री नावाचे इलेक्टीकल्स दुकान फोडून सुमारे ४६ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात दोघा दुकानांच्या गल्यातील ६ हजार ५०० रूपयांची रोकड आणि किराणा व इलेक्ट्रीक वस्तू असा सुमारे ४६ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत. दुसरी घटना अंबड लिंक रोडवरील डीजीपीनगर भागात घडली. मनिष लक्ष्मण पवार (रा.त्रिमुर्ती चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पवार यांचे काठोळे ड्रायव्हींग स्कूल जवळ श्रीनिधी कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून गल्यातील रोकड,साड्या, रेडिमेड कपडे आणि कुर्ते असा सुमारे ७० हजार ५३० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अदिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
गुरूद्वाररोडला ७५ हजाराची घरफोडी
गुरूद्वारारोडवरील शिंगाडा तलाव भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह देवघरातील भांड्याचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल मोहन टिळक (रा.अभिजीत अपा.गुरूद्वारारोड शिंगाडातलाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. टिळक कुटूंबिय ८ ऑगष्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान सातपूर येथे गेलेले असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ७४ हजार ७९० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोंदळे करीत आहेत.