औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत वृध्द ठार
नाशिक : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ७१ वर्षीय पादचारी वृध्द ठार झाले. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वागू धोंडीराम चाठ (रा.कार्बननाका,शिवाजीनगर) असे दुचाकीच्या धडकेत ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. चाठ बुधवारी (दि.८) रात्री जेवण आटोपून शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. परिसरातून फेरफटका मारून चाठ आपल्या घराकडे पायी जात असतांना महादेव मंदिर परिसरातील खाद्यपदार्थ गाडींजवळ पाठीमागून येणाºया अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात चाठ गंभीर जखमी झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत.
…..
वेगवेगळय़ा भागात राहणा-या तीन तरूणांनी केली आत्महत्या
नाशिक : शहरातील वेगवेगळय़ा भागात राहणा-या तीन तरूणांनी गुरूवारी (दि.९) आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड, पंचवटी आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. श्रीकांत राम कापरी – यादव (१९ रा.सत्यम पॉली कंटेनर,अंबड) या युवकाने बुधवारी रात्री अज्ञात कारणातून राहत्या ठिकाणी गळफास लावून आत्महत्या केली. संजय यादव यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक महाजन करीत आहेत. दुसरी घटना मखमला बाद नाका भागात घडली. आदेश संतोष घोलप (२१ रा.आव्हाड चाळ,जाधव कॉलनी) या तरूणाने गुरूवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील स्वयंपाक घरात हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सुनिल बागुल यांनी दिलेल्या खबरीवरून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत. तर विकास सर्जेराव धायजे (२५ रा.भिमवाडी,सहकारनगर गंजमाळ) या युवकाने गुरूवारी पाथर्डी गावातील सुखदेवनगर भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये अज्ञात कारणातून बल्लीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला.याबाबत रंगनाथ गवळी यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.