नाशिक : गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी केलेली हद्दपारीची कारवाई कागदोपत्रीच राहत असल्याने पोलीसांनी तडिपार गुंडावर कारवाईचा बडगा उगारला आहे. संबधीताचा शहरातील वाढता वावर लक्षात घेवून धरपकडचा आदेश जारी करण्यात आला असून पहिल्याच दिवशी चार तडिपार गुंडाना जेरबंद करण्यात आले आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी तडीपारीचे शस्त्र उपसत गुन्हेगारांना पळता भुई थोडी केली. शहरातील नामचिन टोळयांसह संघटीत गुन्हेगारी करणा-या सुमारे शंभरहून अधिक गावगुंडाना एक आणि दोन वर्षासाठी शहर व जिह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई कागदोपत्रीच असल्याची जाणीव होत आहे. हद्दपारीची कारवाई करण्यात आली असली तरी शहरात तडीपारांचा उपद्रव सुरूच आहे. तडीपार गुंडाचा राजरोसपणे शहरात वावर असून त्यांच्या कडून इप्सित साध्य केले जात आहे.
यापार्श्वभूमिवर आयुक्तानी संबधीतांना जेरबंद करण्याचा आदेश सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना दिला आहे. बुधवारी (दि.८) वेगवेगळय़ा भागात चार तडीपार करण्यात आलेल्या विकी विष्णू रोकडे (२० रा. म्हाडाकॉलनी,भारतनगर) यास त्याच्याच घरात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस शिपाई अनिल आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई कालीकानगर भागात करण्यात आली. गणेश तानाजी दातीर (२८ रा.मायको दवाखान्याजवळ) यास पंचवटी पोलीसांनी अटक केली. तो आपल्या घरी आला असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी सापळा रचून त्यास जेरबंद केले. गणेश झुंबर आहेर (२४ रा.महाराणा प्रताप नगर,भंडारी गल्ली फुलेनगर) या तडीपारास त्याच्याच घरात अटक करण्यात आली. तर सागर गणपत बोडके (२१ रा.भरत पटेल गल्ली,फुलेनगर) यास त्याच्या घरातून जेरबंद करण्यात आले. पोलीस शिपाई घनश्याम महाले, अंबादास केदार आणि राजेश गोपाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, अधिक तपास अनुक्रमे पोलीस नाईक डी.पी.नाईक,जमादार काकड आणि पोलीस नाईक एस.पी.कुलकर्णी करीत आहेत.