नाशिक – डोक्यात दगड घालून एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना पहाटे तीनच्या सुमारास रामसेतू पूल परिसरात उघडकीस आली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून पोलिसांनी एकास ताब्यात घेतल्याचे कळते. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अनिल गायधनी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गायधनी एका हाँटेल मधील आचारी असल्याचे बोलले जाते. पहाटेच्या सुमारास रामसेतू पूल परिसरातील राजहंस दुकानाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर नाशिक पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरू केले. दरम्यान, परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.आपापसातील भांडणातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना समजले. यानंतर काही वेळातच पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरू केले. यानंतर काही वेळेतच संशयित ताब्यात घेण्यात आला.