विनापरवाना पिस्तूल बाळगणा-या तरूणास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : विनापरवाना पिस्तूल बाळगणा-या तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. नारायण बापू नगर भागात पिस्तूल घेवून फिरत होता. त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असा सुमारे २० हजार रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललीत भगवान चौधरी (२३ रा.पंचक,जेलरोड) असे संशयीताचे नाव आहे. चौधरी सोमवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास कॅनोल रोड भागात पिस्तूल घेवून फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून त्यास ताब्यात घेतले असता अंगझडतीत विनापरवाना गावठी बनावटीचा पिस्तूल आणि जीवंत काडतुसे असा सुमारे २० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विनोद लखन यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गोडसे करीत आहेत.
शहरात वेगवेगळ्या भागात तिघांची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, वेगवेळया भागात राहणा-या तीघांनी सोमवारी (दि.६) आत्महत्या केली. त्यात एका महिला आणि दोन तरूणाचा समावेश आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी,सातपूर आणि गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आल्या आहेत. प्रतिक सुरेश तेलंगी (२५ रा.देवी मंदिराजवळ,गणेशवाडी) या युवकाने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत. दुसरी घटना सातपूर येथील महादेववाडीत घडली. वनिता त्र्यंबक पवार (२९ रा.लक्ष्मी चौक) या महिलेने सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियानी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत. तर औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणा-या किशोर युवराज वारडे (३६ रा.सती आसरा कॉलनी,पाझर तलाव रोड) यांनी रविवारी (दि.५) रात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना सोमवारी त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत.