पत्नीचा पतीवर विषप्रयोग; पत्नीसह मानलेल्या भावाविरूद्द गुन्हा दाखल
नाशिक : मानलेल्या भावाच्या मदतीने बेदम मारहाण करीत पतीवर विषप्रयोग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पत्नीसह तिच्या भावाविरूद्द आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार देवका केदारे व संदिप सिताराम वाघ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत भाऊ बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी डॅनी वसंत केदारे (३१ रा.जुना भगूर रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. दि.२१ जुलै रोजी रात्री हा प्रकार घडला. केदारे दांम्पत्य आपल्या घरात असतांना पत्नीचा मानलेला भाऊ तेथे आला. यावेळी कौटूंबिक कारणातून पती पत्नीत वाद झाला असता ही घटना घडली. संशयीत मानलेल्या भावाने कुरापत काढून महिलेच्या पतीस शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. याप्रसंगी पत्नीने हात पकडून तसेच आता तुला बघून घेतो असे म्हणत दोघांनी त्यांची मान दाबून बळजबरीने विषारी औषध पाजल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कपले करीत आहेत.
…..
रस्यात थांबून बोलणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल भामट्यांनी केला लंपास
नाशिक : रस्यात थांबून बोलणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नाशिकरोड येथील उड्डाणपूलावर घडली. या घटनेत धाडसी तरूणाने वेळीच पाठलाग केल्याने एक चोरटा पोलीसांच्या हाती लागला असून, पळताभुई थोडी केल्याने ते आपली दुचाकी सोडून पसार झाले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल नवसू सराई (२० रा.कुशेगाव वाडिवºहे) असे मोबाईल हिसकावल्या प्रकरणी अटक केलेल्या संशयीताचे नाव असून त्याचा दांडा नामक साथीदार फरार आहे. याप्रकरणी आदेश कैलास भोजे (रा.मगरमळा,एकलहरारोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. भोजे रविवारी (दि.१५) रात्री उड्डाणपूलावरून आपल्या घराकडे दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. दत्तमंदिर सिग्नल येथून सिन्नर फाट्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना वाटेत त्याला फोन आला. रस्त्यात दुचाकी थांबवून तो मोबाईलवर बोलत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या पल्सरस्वारांपैकी एकाने हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. मात्र भोजे यांनी गांभिर्य ओळखून चोरट्यांचा पाठलाग केला. त्यामुळे रोकडोबावाडी भागात भामट्यांनी आपली दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेवून पोबारा केला. भोजे यांनी याबाबतची माहिती पोलीसांना कळविल्याने एक संशयीत पोलीसांच्या हाती लागला असून, रस्त्यात सोडलेल्या दुचाकीचा प्रादेशीक परिवहन विभागाच्या माध्यमातून केलेल्या शोधात तो पोलीसांच्या जाळयात अडकला आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असून, तो हाती लागताच जबरीचोरीच्या अनेक गुह्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.