नाशिक : मद्यसेवन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून घरावर दगडफेक करणा-याला पोलिसांनी गजाआड केले आहे. सनी मनोहर थोरात (२३ रा.भेंड्डी गल्ली,शनिमंदिराजवळ पेठरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष विष्णू यादव (रा.दत्तनगर झोपडपट्टी,पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. यादव शुक्रवारी सायंकाळी आपल्या घरी असतांना संशयिताने बाहेर आवाज देवून बोलावून घेतले. यावेळी त्याने दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली परंतू यादव यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने रस्त्यावर पडलेला सिमेंटचा दगड उचलवून यादव यांच्या घरात भिरकावला. या घटनेत यादव यांच्या कपाटाचे नुकसान झाले असून त्यांनी वेळीच घरात धाव घेत दरवाजा बंद केल्याने अनर्थ टळला. एवढ्यावरच न थांबता संशयिताने त्यांना शिवीगाळ करीत घरावर दगडफेक केली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पंचवटी पोलीसांनी त्यास अटक केली असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.