नाशिक : लाल मिरची खरेदीच्या बहाण्याने शहरातील दोघांनी कोल्हापूर येथील व्यापा-यास तब्बल पंधरा लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. भामट्यांनी दिलेला धनादेश न वटल्याने व्यापा-याने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसिन अकिल शेख व त्याचे दोन अनोळखी साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी संदिप रावसाहेब पाटील (रा.शिरोळ जि.कोल्हापूर) या मिरची व्यापा-याने तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतमालाचा व्यापारी असल्याचे भासवून संशयीतांनी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. २० फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान मिरची खरेदीच्या मोबदल्यात १५ लाख रूपयांचा व्यवहार निश्चित करण्यात आला होता. माल ताब्यात मिळताच पैसे देण्याची बोली असल्याने पाटील यांनी टेम्पो भरून मिरची पाठविली होती. पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल एक्सप्रेस इन पाठीमागील भागात कोल्हापूरहून आलेला टेम्पो पोहचताच संशयीतांनी तो दुस-या टेम्पोत खाली करून घेतला. यावेळी पाटील यांना लवकरच पैसे देतो असे सांगून संशयीतांनी धनादेश दिला. मात्र तीन चार महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने पाटील यांनी धनादेश बँकेत वटण्यासाठी टाकला असता तो वटला नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने पाटील यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.