नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. निवासी वसतिगृह (आधाराश्रम) मध्ये राहणाऱ्या आदिवासी शाळकरी मुलीसोबत हे कृत्य झाले आहे. विशेष म्हणजे, वसतिगृहाच्या ३० वर्षीय संचालकानेच हे संतापजनक कृत्य केले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नाराधामा विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसरुळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील माने नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. या घटनेने नाशिक हादरले आहे. द किंग फाऊंडेशन संचालित आधाराश्रमातील हा धक्कादायक प्रकार आहे. आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील ३० हून अधिक मुले मुली वास्तव्यास आहेत. याच निवासी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलीवर ३० वर्षीय संचालकानेच बलात्कार केला आहे.
मुलीच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार घडल्याने नाशिक पुन्हा हादरले आहे.
दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आधारतीर्थ आश्रमात चार वर्षाच्या बालकाची हत्या करण्यात आल्याचे दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आले आहे. त्र्यंबकरोडवर हा आधाराश्रम आहे. त्यानंतर आज किंग फाऊंडेशन संचालित ज्ञानपीठात गुरुकुल आधार आश्रमात बलात्काराचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Crime Nashik Minor Girl Rape Adharashram