नाशिक – शहर व परिसरात अपघाताची मालिका सुरूच असून, वेगवेळ्या भागात झालेल्या अपघातांमध्ये तीन दुचाकीस्वार ठार झाले. याप्रकरणी म्हसरूळ, आडगाव आणि अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मखमलाबाद-मातोरी रस्त्यावरील अपघात
मुंगसरा ता.जि.नाशिक येथील अशोक नाना वायचळे (५५) हे सोमवारी (दि.२) सायकांळच्या सुमारास मखमलाबाद येथून मातोरीच्या दिशेने आपल्या अॅक्टीव्हावर एमएच ०४ सीएस ४२०३ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. बर्वे नर्सरी भागात पाठीमागून भरधाव आलेल्या कारने (४०५७ पूर्ण नंबर मिळू शकला नाही) दुचाकीस धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वायचळे यांचा मृत्यु झाला तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पुतण्या अर्जुन वायचळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कारचालकाविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
आडगाव शिवारातील अपघात
या अपघातात रविंद्र भाऊराव मोंढे (१९ रा.लालवाडी जानोरी ता.दिंडोरी) हा युवक ठार झाला. तर किशोर भास्कर बेंडकुळे (२५) व सुरज काशिनाथ बेंडकुळे (२४ रा.आंबेडकरनगर,ओझर टाऊनशिप ता.निफाड) हे दोघे जखमी झाले. मोंढे व किशोर आणि सुरज बेंडकुळे हे तीघे मित्र रविवारी (दि.१) आपल्या स्प्लेंडर एमएच १५ एफसी ०७५२ या दुचाकीवर ट्रिपलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. ओझरकडून नाशिकच्या दिशने भरधाव येणाºया ट्रिपलसिट मित्रांची दुचाकी पुढे जाणाºया अज्ञात वाहनावर आदळली. महामार्गावरील हॉटेल पुनम व राजस्थानी ढाब्यासमोर हा अपघात झाला. या अपघातात मोंढे याचा मृत्यु झाला तर दोघे बेंडकुळे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हवालदार अभिमन्यु गायकवाड यांच्या तक्रारीवरून मृतचालक रविंद्र मोंढे याच्याविरूध्द आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
अंबड औद्योगिक वसाहत
तिसरा अपघात औद्योगिक वसाहतीतील कृष्णा स्विटस समोर झाला. अंबड गावातील स्वामीनगर भागात राहणारे जगत चंद्रभान सिंग (३८) हे सोमवारी (दि.२) आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. औद्योगीक वसाहतीतील कृष्णा स्विटस समोरून प्रवास करीत असतांना भरधाव अज्ञात मालट्रकने दुचाकीस धडक दिल्याने जगत सिंह गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.
—
परप्रांतीय कुटुंबास बेदम मारहाण
नाशिक – साखर झोपेत असलेल्या परप्रांतीय मजूर कुटूंबियास बेदम मारहाण करीत टोळक्याने रोकडसह महिलांच्या अंगावरील दागिणे हिसकावून घेत पोबारा केल्याची घटना तिडके कॉलनीत घडली. लोखंडी रॉड आणि कोयत्याचा धाक दाखवित ही लुटमार करण्यात आली असून, पोलीसांनी सहा सराईतांना जेरबंद केले आहे. अटक केलेल्यांमध्ये चार संशयीत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम उर्फ रिंक्या सुभाष भामरे (२४ रा.कालिका मंदिरामागे),विक्रांत नाना सोनवणे (२६ रा.आरटीओ,पेठरोड),गगन शंकर विधाते (२५ रा.सहवासनगर),ओंकार दादासाहेब लोंढे (२१ रा.डीजीपीनगर),किरण सुभाष भामरे व शरद फुलसुंदर अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून रोहित माने व विश्वा वाघमारे नामक संशयीत अद्याप फरार आहेत. याप्रकरणी दिपक रमेश वास्कले (मुळ रा. मध्यप्रदेश हल्ली तिडके कॉलनी) या परप्रांतीय मजूराने तक्रार दाखल केली आहे. वास्कले कुटूंबिय बांधकाम व्यावसायीक हर्षद मरकर यांच्या तिडके कॉलनीत नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवर बिगारी काम करतात.
बांधकाम व्यावसायीकाने या कुटूंबियासाठी आपल्या साईटवरच एका गाळ्यात राहण्याची व्यवस्था केलेली असून सोमवारी (दि.२) रात्री कुटूंबिय झोपी गेले असता ही घटना घडली. मध्यरात्री टोळक्याने गाळ्याचे अर्धवट शटर उघडे असल्याची संधी साधत घरात प्रवेश केला. यावेळी झोपी गेलेल्या वास्कले कुटूंबियास टोळक्याने शिवीगाळ करीत लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
संतप्त टोळक्याने धारदार कोयत्याचा धाक दाखवित दिपक वास्कले यांच्या पत्नी व आईच्या अंगावरील दागिणे ओरबाडून घेतले. तसेच वडिलांच्या खिशातील साडे सहा हजार रूपये आणि मोबाईल असा ९ हजाराचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. भेदरलेल्या वास्कले कुटूंबियांनी बांधकाम व्यावसायीकास घटनेची माहिती दिल्याने पोलीसांनी घटनास्थळ गाठून गुह्याची नोंद केली असून परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. संशयीतांना न्यायालयाने शुक्रवार (दि.६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक आहिरे करीत आहेत.