मुंबई – मुंबई सायबर पोलिस ठाण्याच्या ईमेल अकाउंट हॅकिंग प्रकरणात अकाउंटवरून एक हजारांहून अधिक सरकारी विभाग आणि खासगी व्यक्तींना बनावट गुप्तचर अहवालाचा फिशिंग मेल पाठविण्यात आला आहे, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. हॅकर्सचा गोपनीय माहिती चोरी करण्याचा इरादा होता. परंतु राज्य सायबर पोलिसांनी त्वरित कारवाई करत ईमेल प्राप्तकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना पासवर्ड बदलण्याच्या सूचना केल्या.
हॅकर्सकडून पाठविण्यात आलेल्या ईमेल्सच्या सब्जेक्टमध्ये मुंबईमध्ये जेके हल्ल्याला जबाबदार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे, असे लिहिले होते. तसेच इंटेलिजेंस रिपोर्टच्या नावाने एक पीडीएफ अॅटॅच करण्यात आली. पीडीएफवर क्लिक केल्यानंतर युजर्स एका नव्या संकेतस्थळावर जाऊ शकत होते. त्यांच्या ईमेल अकाउंटशी छेडछाड करू शकले असते. युजर्सना आधी मिळेलेला ईमेल वाचू शकत होते आणि गुप्तचर माहिती मिळवू शकले असते. संबंधित ईमेल पूर्व क्षेत्राच्या सायबर पोलिस ठाण्याच्या ईमेल आयडीवर पाठविण्यात आला होता.
महाराष्ट्र सायबर पोलिस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलिस ठाण्याचा ईमेल अकाउंट हॅक केले असे आपण पूर्णपणे म्हणू शकत नाही. कारण त्या ईमेलला अॅक्सेस करू शकले नाही. परंतु त्यांच्या ईमेल आयडीचा वापर करून ईमेल पाठविण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र, दिल्ली आणि देशाच्या इतर भागात हजारो पोलिस कार्यालये, सरकारी अधिकारी आणि खासगी व्यक्तींना फिशिंग ईमेल प्राप्त झाले.
हा ईमेल पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रावळपिंडीहून पाठविण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे, अशी माहिती राज्य सायबर पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे दिली. परंतु ईमेल पाकिस्तानमधूनच आला आहे की नाही याबाबत स्पष्ट सांगितले जाऊ शकत नाही. इतर ठिकाणावरून पाठवून पाकिस्तानच्या सर्व्हरवरून पाठविल्याचे भासविले जाऊ शकते. एका व्यक्तीने हे पीडीएफ बनविले आहे. परंतु याबद्दल जास्त माहिती दिली जाऊ शकत नाही, असे अधिकार्यांनी सांगितले.