इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आई म्हणजे वात्सल्याचा झरा. आई जणू दुसरा ईश्वरच. आई आणि मुलाचे नाते हे जगातील अत्यंत पवित्र नाते मानले जाते. मात्र, तामिळनाडूत एक अमानुष प्रकार घडला आहे. एका मातेने चक्क आपल्या मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, तिसरे लग्न करण्यासाठी या महिलेने दुसऱ्या पतीपासून जन्माला आलेल्या मुलीचा जीव घेतला आहे. या अमानुष प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३८ वर्षीय महिलेने आपला प्रियकर तथा तिसरा पतीवरील प्रेम सिद्ध करण्यासाठी आपल्या मुलीचा बळी दिला. या महिलेने तिसरे लग्न केले होते. दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगीही होती. पतीने महिलेला प्रेमाचे सत्य सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्यामुळे या क्रूर आईने मुलीलाच जिवंत जाळून टाकले. यात ती ७५ टक्के भाजली. त्यानंतर या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. पतीने पत्नी जया लक्ष्मीला आपली निष्ठा सिद्ध करण्यास सांगितले. पतीला आपले प्रेम दाखवण्यासाठी जया लक्ष्मी म्हणाली की, जर माझे प्रेम खरे असेल तर माझ्या मुलीला अग्नी देखील काही करणार नाही. यानंतर लक्ष्मी खोलीत गेली. झोपलेल्या मुलीला बाहेर घेऊन आली. इतकेच नव्हे तर तिने मुलीवर रॉकेल ओतून तिला आग लावली. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. मुलगी खूप भाजली होती. परिसरातील नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी जया लक्ष्मीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
जया लक्ष्मीचे पहिले लग्न वयाच्या १९ व्या वर्षी झाले होते. पतीशी भांडण झाल्याने जया लक्ष्मीने पतीच्या भावाशीच लग्न केले आणि पाहिल्या पतीला सोडले. दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगी झाली. काही दिवसांनी तिची मैत्री घटस्फोटित ड्रायव्हर पद्मनाभनशी झाली. जया लक्ष्मीने दुसऱ्या पतीला सोडून दिले आणि पद्मनाभशी लग्न केले. ९ वर्षांपासून त्यांचा संसार सुरू आहे. त्यांना दोन मुले आहेत.