इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आईच्या प्रेमाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका आईने आपले 15 दिवसांचे नवजात बालक विकले. मुलाला विकून मिळालेल्या पैशातून आईने फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन अशा वस्तू खरेदी केल्या. आरोपी आईने पतीच्या संमतीने हा व्यवहार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या हीरा नगर भागात राहणाऱ्या शैना बी या महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीला मुलावर संशय होता. महिलेने सांगितले की, ‘माझ्या पतीला गर्भपात करायचा होता, पण वेळ खूप जास्त होता, त्यामुळे आम्ही दलालांमार्फत मूल विकण्याचा बेत आखला आणि ते मूल देवास येथील एका जोडप्याला विकले.’ हे मूल लीना नावाच्या महिलेने विकत घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. लीनाने सांगितले की, अलीकडेच तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी मुलाला साडेपाच लाखांना विकत घेतले.
पोलिसांनी सांगितले की, मुलाची विक्री केल्यानंतर मिळालेल्या पैशातून महिलेने टीव्ही, फ्रीज, कुलर आणि वॉशिंग मशीन या वस्तू खरेदी केल्या होत्या, त्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, ‘सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती देण्यात आली. याप्रकरणी आरोपी आई शायरा बी हिच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एक अल्पवयीनही आहे. यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन सध्या फरार आहेत. लवकरच फरार आरोपींनाही जेरबंद करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.