रोहतक (हरियाणा) – आईने मुलाशी संगनमत करून पोटच्या मुलाचा खून केल्याची बाब उघडकीस आली आहे. महम चौबीसीमधील सैमाण या गावात दोन महिन्यांपासून बेपत्ता कर्मपाल ऊर्फ राहुलच्या (२३) हत्येप्रकरणी त्याच्या आई आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाचा पुरलेला छिन्नविछिन्न मृतदेह बाहेर काढला. माय-लेकाला अटक करून न्यायालयासमोर उभे केले. दोघांनाही दोन दिवसांची कोठडी मिळाली आहे.
महम पोलिस ठाण्याचे पोलीस प्रभारी निरीक्षक शमशेर सिंह सांगतात, पेटवाडा गावातील रहिवासी सतीशने तक्रार केली. त्यात म्हटले की, त्याचा मेव्हणा सत्यवान राजमिस्त्री आहे. त्याचे राहुल आणि विकास असे दोन मुलगे आहेत. राहुलचे आपल्या आईशी पटत नव्हते. आत्याला भेटण्यासाठी राहुल दर पंधरा दिवसांनी पेटवाडाला येत होता. परंतु दोन महिन्यांपासून तो आलाच नाही. राहुलचा खून त्याच्याच आईने करून मृतदेह घरातच पुरल्याची शंका त्यांनी व्यक्त केली होती.
पोलिसांनी संशयाच्या आधारावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कर्तव्यावर असलेले दंडाधिकारी नायब तहसीलदार राजकुमार यांच्या उपस्थितीत महम पोलिसांनी एफएसएलच्या पथकासोबत घराच्या स्टोअर रूममध्ये खोदकाम केले. त्यात पाच फूट खोल खड्ड्यातून एक छिन्नविछिन्न मृतदेह बाहेर काढला.
असा पुरला मृतदेह
संशियत आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राहुल आपल्याशी नेहमी भांडत होता. त्याच्याकडून आपल्या जिवाला धोका होता. ६ जूनला तो घरी भांडत होता. त्यामुळे लहान मुलगा विकासला सोबत घेऊन दोरीने त्याचा गळा आवळला. मृतदेह बाहेर काढल्यास पकडल्या जाण्याच्या भीतीने घरातच तो पुरण्याचा निर्णय घेतला. रात्री स्टोअर रूममध्ये चार ते पाच फुटाचा खड्डा खोदला. मृतदेहाला त्याच खड्ड्यात पुरून दुर्गंधी पसरू नये यासाठी वर सिमेंटची फरशी लावली. त्याच दिवशी घराला कुलूप लावून माय-लेक निघून गेले. पोलिसांनी आईला फरिदाबाद येथून तर मुलाला रोहतक येथून अटक केली.