इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – किरकोळ कारणावरून हाणामारी होणे ही काही नवीन बाब नाही परंतु मोबाईल चोरी प्रकरणावरून बिहार मध्ये दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात काही महिलांसह आठ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरु आहे.
रात्रीच्या वेळी भागलपूरच्या तातारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परबत्ती येथील नौवटोली येथील लॉजवर मोबाईल चोरीवरून झालेल्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीत आठ जण जखमी झाले. या घटनेत दोन्ही बाजूने अर्धा तास दगडफेक सुरूच होती. घटनेची माहिती मिळताच डीएम सुब्रत कुमार सेन आणि एसएसपी बाबू राम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली. दोन्ही बाजूंच्या जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे.
या घटनेनंतर नौवटोली येथील रहिवासी छोटू मंडल यांनी सांगितले की, चौरसिया लॉजजवळ व्यसनींचा अड्डा आहे. त्यातील काही जणानी विद्यार्थ्याचे मोबाईल चोरले. त्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे जाब विचारण्यासाठी गेले असता त्या व्यसनींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच आम्ही मोबाईल चोरले नाहीत, आमचा काही संबंध नाही, मोबाईल चोरीची चौकशी करायला का आले असे म्हणत त्यांच्याकडच्या काही जणांनी मारहाण सुरू केल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर त्याचा भाऊ , आई व वडील आले तेव्हा त्या सर्वांना मारहाण करून जखमी केले.
या घटनेची पोलीसांकडून दोन्ही बाजूंची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी पोहोचलेले डीएम सुब्रत कुमार सेन म्हणाले की, आपापसात भांडणाची ही घटना आहे आणि इतर कोणत्याही घटनेशी त्याचा काहीही संबंध नाही. तपास सुरू असून जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांना दंड करण्यात येत आहे.