नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बालविवाह लावून देणे तसेच बालविवाह करणे हा गुन्हा मानला जातो. तरीही ही विकृत मानसिकता आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. असाच धक्कादायक प्रकार हिंगणघाट शहरात उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली. अवघ्या १४ वर्षीय मुलीचा बालविवाह लावून तिला गर्भवती केल्याची लाजीरवाणी घटना पीडिता गर्भवती राहिल्याने उघडकीस आली.
बालविवाह प्रतिबंध कायदा’ हा महत्त्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. सोप्या भाषेत या कायद्यातल्या तरतुदी सांगता येतील. या कायद्याप्रमाणे १८ वर्षांहून लहान मुलगी व २१ वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाहीत. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत.
बालवधूबरोबर लैंगिक संबंध झाले असल्यास ‘पॉक्सो’ कायद्याने गुन्हा दाखल होतो. बालिकेला विवाहासाठी पळवून नेल्यास, खरेदी-विक्री केल्यास तो विवाह अवैध ठरतो. बालविवाह थांबवण्यासाठी कोणालाही न्यायालयात अर्ज करता येतो. न्यायालय विरुद्ध बाजू समजून घेऊन मग निकाल देते; पण त्यापूर्वी विवाह थांबवण्याचा आदेश न्यायालयाला देता येतो. अशा आदेशानंतरही बालविवाह केल्यास तो अवैध ठरतो.
या बालविवाह प्रकरणात हिंगणघाट पोलिसांनी आरोपी पतीसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केल्याची माहिती दिली. हिंगणघाट शहरातील रहिवासी अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी आरोपी फुला देसू कुराडे (५०) हिने आरोपी जिवन रामकिसन देवतळे (३५) याच्याशी बालविवाह लावून दिला. आरोपी जीवन याने पीडितेवर वारंवार अत्याचार करुन तिला गर्भवती केले.
पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेले असता हा धक्कादायक व समाजमन सुन्न करणारा प्रकार उजेडात आला. याप्रकरणाची माहिती तत्काळ हिंगणघट येथील पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडित मुलीचे बयाण नोंदवून आरोपी जिवन देवतळे आणि फुला देसू कुराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली. पीडितेवर हिंगणघाट येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Crime minor girl Pregnant Police investigation