इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे करण्यात आले असले तरी त्याचा काहीही फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरपूर परिसरात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास गावातील दुकानातून वस्तू घेऊन घरी परतणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. इतकेच नव्हे तर गावातील दोन तरुणांनी मुलीला कालव्याच्या काठावर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीची प्रकृती बिघडल्याने दोन्ही आरोपी तेथून पळून गेले. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
मुलीला उपचारासाठी रूग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिस स्टेशन अधिकारी राज कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी कुटुंबियांच्या तक्रारीनंतर गावातील अमलेश कुमार आणि हेमंत कुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलगी रात्री घराजवळील किराणा दुकानात सामान घेण्यासाठी गेली होती. दोन्ही आरोपी तिथे आधीच हजर होते. दुकानातून सामान घेऊन मुलगी घरी जाऊ लागली असता दोन्ही आरोपींनी मुलीला जबरदस्तीने तोंड दाबून उचलून नेले.
मुलीला जवळच असलेल्या कालव्याच्या काठावरील निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे दोन्ही आरोपींनी मुलीवर बलात्कार केला. बराच वेळ मुलगी घरी न पोहोचल्याने तिचे कुटुंबीय शोधासाठी बाहेर पडले. त्यांनी त्या दुकानात चौकशी केली. तिथेही ती सापडली नाही. त्यानंतर शोध घेत असतानाच कालव्याच्या बाजूने मुलीच्या रडण्याचा आवाज आला. यानंतर नातेवाइकांनी त्या दिशेने धाव घेतली असता दोन्ही आरोपी रस्त्याने धावताना दिसले.
पीडित मुलीला कुटुंबीयांनी उचलून घरी आणले. मुलीचे कुटुंबीय आरोपीचा शोध घेत त्यांच्या घरी पोहोचले असता आरोपीच्या नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. तसेच पॉक्सो कायदा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे.