इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. अनेक राज्यांमध्ये महिलांवर बलात्कार, विनयभंग, लैंगिक छळ, मानसिक त्रास यासारख्या घटना घडत आहेत. काही वेळा त्या उघडकीस येतात, तर काही वेळा लाजेस्तव त्या समाजापुढील येतच नाहीत. अनेक वेळा महिलांवर अत्याचार करणारे त्यांचे नात्यातील व्यक्तीच असतात. त्यामुळे हे प्रकरण दाबले जाते. अलीकडच्या काळात मोबाईलचा वापर करून गरिब, निराधार आणि अबला महिलांचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यात दिव्यांग मामाने आपल्याच भाचीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमध्ये समोर आली आहे.
कनकेर शहरातील एका वॉर्डात राहणाऱ्या दिव्यांग मामाने त्याच्याच भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यातील १५ वर्षीय पीडितेच्या पालकांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर पीडिता तिच्या आजीसोबत राहत होती. त्यांच्यासोबत तिची धाकटी बहीण आणि तिचे अपंग मामाही राहत होते. पीडित मुलीची आजी वसतिगृहात कामाला जात असून रोज संध्याकाळी साडेपाच वाजता वसतिगृहात जायची आणि सकाळी साडेसातला परत यायची. पीडित मुलगी तिची धाकटी बहीण आणि तिचे मामा रात्री घरीच होते. आरोपी मोबाईलवर भाचीसोबत क्राईम पेट्रोलिंग पाहत होता. या दरम्यान त्यातील राक्षस जागा झाला आणि आरोपीने अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवले. तसेच यासोबतच घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
घटनेच्या वेळी पीडितेची आजी घरी नव्हती. त्याचवेळी त्याच्या मामाने या घटनेची कोणालाही माहिती न देण्याची धमकी दिली होती. मात्र पीडितेने तिच्या मित्राला घटनेची माहिती दिली आणि तिच्या मैत्रिणीने तिच्या वडिलांना घटनेची माहिती दिली. मैत्रिणीच्या वडिलांनी जिल्हा बाल संरक्षण विभागाशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर पीडितेचे समुपदेशन करण्यात आले, त्यामध्ये ही घटना उघडकीस आली आणि या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









