नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – सोशल मिडीयाद्वारे चालणाऱ्या मोठ्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश दिल्ली पोलीसांनी केला आहे. या प्रकरणी ओटी टेक्निशियन, दोन डॉक्टरांसह तब्बल 10 आरोपींना अटक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपला व्यवसाय चालवत होते. किडनी दात्यांच्या नावाने वेगवेगळी पेज तयार करण्यात आली होती. गरिबांच्या असहायतेचा फायदा घेत आरोपी त्यांना काही रुपयांचे आमिष दाखवून त्यांची किडनी विकत होते. आरोपींनी आतापर्यंत सुमारे 20 जणांच्या किडनी काढल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस उपायुक्त बेनिता मेरी जॅकर यांनी सांगितले की, हौज खास भागात किडनी रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या टोळ्या गरजू आणि गरीब नागरिकांना टार्गेट करून काही रुपयांचे आमिष दाखवून त्यांची किडनी काढतात. यानंतर गरजूंना महागड्या किमतीत विकात होते. या घटनेची पोलखोल करण्यासाठी पोलीसांची विशेष टीम तयार करण्यात आली. टोळीचे सदस्य वैद्यकीय तपासणीसाठी हौज खास येथील प्रयोगशाळेत एका दात्याला घेऊन गेल्याचे पोलिस पथकाला समजले. पोलिसांना पिंटूकुमार यादव हा लॅबजवळ सापडला.
पोटदुखीच्या बहाण्याने सरबजीत आणि विपीनने त्याला आणले होते. नंतर पिंटूला आपली किडनी काढण्यात येणार असल्याचे समजताच तो घटनास्थळावरून निघून गेला. हौज खास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सरबजीतला ताब्यात घेण्यात आले. चौकशी केल्यानंतर रघुशर्मा नावाची व्यक्ती सापडली. या टोळीने त्याची किडनी काढून विकली आहे. रघूच्या मदतीने पोलिसांचे पथक पश्चिम विहारमधील एका फ्लॅटवर पोहोचले. पोलिसांना शैलेश पटेलसह चार जण तेथे सापडले.
तपासाअंती पोलिसांनी मुख्य आरोपी सरबजीत जैस्वाल (37), मुख्य आरोपी शैलेश पटेल (23 ) यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत सरबजीत आणि शैलेश यांनी सांगितले की, ते गरीब लोकांना पैसे देऊन आपल्या जाळ्यात अडकवायचे. त्याबदल्यात विकास आणि एक डॉक्टर 30 ते 40 हजार रुपये देत असत. त्यानंतर हे दोघे किडनी काढून श्रीमंत लोकांना विकायचे. किडनी काढल्यानंतर विपिन आणि अभिषेक गरिबांना भेटून पैसे देत होते.
पोलिसांच्या चौकशीनंतर लतीफ नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली. कुलदीप राय हा विश्वकर्मा टोळीचा सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण रॅकेटमधील प्रत्येक सदस्याला कुलदीप त्याच्या कामानुसार पैसे देत होता. गेल्या सहा ते सात महिन्यांत या आरोपीनीं 20 जणांच्या किडनी काढल्याचा खुलासा आरोपींनी केला आहे. यातील बहुतांश जण हे 20 ते 30 वयोगटातील तरुणांची किडनी काढायचे.