मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरातील करबुडव्यांवर वचक ठेवणाऱ्या आयकर खात्याला आपल्याच दिव्याखाली अंधार असल्याचे लक्षात आले नाही. बाहेर कारवाईचे सत्र सुरू असताना आयकर खात्याला त्यांचाच एक कर्मचारी २६३ कोटींनी पोखरत होता. अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्र आणि कर्नाटकात केलेल्या छापेमारीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
आयकर खात्यात वरीष्ठ सहायक अधिकारी पदावर असलेला तानाजी मंडल आपल्याच वरीष्ठ अधिकाऱ्यांचे लॉग-इन वापरून पैसे ट्रान्सफर करत होता. ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत तपास केल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. त्याने टॅक्स रिफंडच्या माध्यमातून २६३ कोटींची रक्कम एसबी इंटरप्रायझेस नावाच्या एका कंपनीच्या खात्यात जमा केली. या संपूर्ण कामात त्याच्यासोबत काही सहकारीही आहेत. त्यातील त्याचा एक मित्र भूषण पाटील याच्याकडे त्याने पैश्यांचे नियंत्रण सोपविले होते. २०१९ च्या नोव्हेंबरपासून १२ बनावट टीडीएस परतव्यांपोटी २६३ कोटी रुपये त्याने फर्मच्या खात्यात जमा केले. भूषण पाटील आणि इतर सहकारी शेल कंपन्यांच्या खात्यांमध्ये पैसा जमा करत होते.
जुने परतावे
२००७-२००८ आणि २००८-२००९ या दोन आर्थिक वर्षांमधील टॅक्स रिफंड बाकी असल्याचे दाखवून तानाजीने २६३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला. त्याने हा सगळा पैसा एस.बी. एंटरप्रायझेसच्या खात्यात परताव्यापोटी जमा केल्याचे उघडकीस आले आहे.
संपत्तीची जप्ती
ईडीने तानाजी मंडल याच्या पुणे, लोणावळा, खंडाळा, कर्जत, कर्नाटकातील उडुपी येथील जमिनी जप्त केल्या आहेत. तसेच आलिशान गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत. मुंबई, पनवेल येथील फ्लॅट्स, लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे, उडुपी येथील स्थावर मालमत्ता, बीएमडब्ल्यू, मर्सिडीझ, ऑडी या आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. ही एकुण मालमत्ता १६६ कोटींची असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
Crime Income Tax Department Officer 263 Crore Fraud