इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानातील भरतपूरमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हुंडा न मिळाल्याने पतीने अतिशय घृणास्पद कृत्य केले आहे, जे ऐकून तुम्हालाही लाज वाटेल. संशयित पतीने पत्नीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. नातेवाईकांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. एवढेच करून तो थांबला नाही, तर त्याने या घृणास्पद कृत्याचे मोबाईमध्ये चित्रण केले. कुटुंबियांनी हुंडा दिला नसल्याने हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकून त्यातून हुंड्याची भरपाई करेल अशी धमकी पत्नीला दिली.
भरतपूरमधील कामां पोलिस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेचे लग्न २५ मे २०१९ मध्ये हरियाणामधील पुन्हानामध्ये झाले होते. लग्नानंतर सासरची मंडळी हुंड्यासाठी तिचा छळ करू लागले होते. दीड लाख रुपये आणि बाईकची मागणी करत होते. ही मागणी पूर्ण केली नाही म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागले. त्यानंतर तिला घरातून बाहेर काढून देण्यात आले होते. ती काही दिवस माहेरी राहिली होती.
पीडितेच्या माहितीनुसार, सहा महिन्यांनंतर एके दिवशी तिचा पती आला आणि तिच्याशी गोड बोलून आणि फसवून घेऊन गेला. त्यानंतर पतीने त्याच्या मेहुणे आणि एका व्यक्तीला घरी बोलावले. दोघांनी महिलेवर अत्याचार केला आणि तिच्या पतीने व्हिडिओ केला. तुझे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकून हुंड्यांच्या पैशांची भरपाई करेन अशी धमकी पतीने महिलेला दिली. आरोपींनी अशाच प्रकारे महिलेचे अनेक व्हिडिओ बनवले होते.
महिलेच्या माहितीनुसार, एक आरोपी पाच दिवसांपूर्वी पीडितेला कामां येथे घेऊन गेला. तिथे एका निर्जन ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पळून गेला. त्यानंतर पीडितेने घरी जाऊन पूर्ण माहिती दिली. महिलेने कामां पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यूट्यूबवर अश्लील व्हिडिओ टाकले आहे की नाही याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.