इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील कोणत्याही प्रांतात असो की, धर्म, पंथ आणि जातीमध्ये लग्नसमारंभात नृत्य करणे किंवा नाच-गाणी ही गोष्ट आता सर्वसामान्य झाली आहे. काही वेळा तर केवळ पुरुष नव्हे तर स्त्रिया देखील संगीत आणि वाद्याच्या तालावर बेधुंद नृत्य करताना दिसतात, परंतु एका महिलेसाठी नृत्य करण्याचा हा प्रकार जीवघेणा ठरला.
झारखंडमधील चतरा येथे एका लग्नसमारंभात दुसऱ्या पुरुषासोबत नाचणे एका महिलेला महागात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लारकुवा गावात रात्री लग्नसमारंभ सुरू होता. गावातील स्त्री-पुरुष डीजेच्या तालावर नाचत होते. यामध्ये काही पुरुष त्यांच्या पत्नीसोबत डान्स करत होते. याच समारंभात शांती देवी नावाची महिला नाचत होती. नृत्यादरम्यान शांतीचा पती दारूच्या नशेत होता.
काही वेळ नाचल्यानंतर शांतीचा नवरा थकला, तेव्हा त्याने तिला घरी जाण्याचा हट्ट केला. पण शांतीने ऐकले नाही आणि घरी जाण्यास नकार दिला. मग काय पती शीतल भारती हा रागाच्या भरात निघून गेला. सुमारे दोन तासांनी त्याची पत्नी घरी पोहोचली. पतीने दरवाजा उघडला आणि त्याने पत्नीला उशीरा येण्याचे कारण विचारले. तेव्हा पत्नीने सांगितले की, ती नाचत होती.
हे ऐकून नवरा संतप्त झाला. त्याने घरातून काठी बाहेर काढली आणि पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुमारे 15 मिनिटे त्या महिलेवर तो लाठ्यांचा वर्षाव करत होता. या बेदम मारहाणीमुळे पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूचा सुगावा लागू नये म्हणून पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने आणखी एक युक्ती केली.
कुटुंबियांनी महिलेचा मृतदेह लटकवला आणि तिने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी स्वत: पोलिसांना फोन केला, जेव्हा पोलीस तेथे पोहोचले, त्यांनी मृतदेह तपासणीसाठी नेला. मात्र शरीरावरील जखमांच्या खुणा पाहून महिलेचा खून झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली तर इतर जण फरार आहेत.