इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात स्त्रिया देखील पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात काम करताना दिसतात, असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे स्त्रिया काम करत नाहीत, कारण हे स्त्री-पुरुष समानतेचे युग आहे, असे मानले जाते. परंतु अद्यापही अनेक पुरुषांची मानसिकता ही मागासलेली दिसून येते. त्यामुळे ते आपल्या पत्नीला घराबाहेर पडण्यास विरोध करतात. इतकेच नव्हे तर तिने नोकरी करू नये, म्हणून देखील असे त्यांना वाटते. अशा विकृत मानसिकतेच्या एका पतीने आपल्या पत्नीवर जिवघेणा हल्ला केला.
पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक आणि भयानक अमानुष घटना समोर आली आहे. पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्राम येथे पत्नीला सरकारी दवाखान्यात नोकरी मिळाल्याने पतीला आनंद होण्याऐवजी त्याला दुःख झाले आणि रागही आला, यामुळे त्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीचा हात कापला. या घटनेनंतर आरोपी पळून गेला. कारण पत्नीने प्रगती करावी, पुढे जावे, रूग्णांची सेवा करावी, असे या महिलेच्या पतीला वाटत नव्हते.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेणू खातून नावाच्या महिलेला सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरी मिळाली होती, मात्र पती मोहम्मद शेख याला भीती वाटू लागली की, जर पत्नीने नोकरी सुरू केली तर ती आपल्यापासून दूर जाईल. नाहीतर, ति सोडून जाईल आणि दुसऱ्याशी लग्न करील. त्याच्या मित्रांनी त्याला चिथावणी दिल्याने मोहम्मद शेखचा संशय बळावला. मोहम्मद शेखचे मित्र अनेकदा म्हणायचे की त्याची पत्नी त्याला एक दिवस नक्कीच सोडून जाईल.
स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की, रेणू नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती आणि ती दुर्गापूर जवळच्या औद्योगिक नगरात एका खासगी रुग्णालयात सहायक म्हणून काम करत होती. नुकतेच तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये रुजू होण्यासाठी नियुक्ती पत्र मिळाले. पण त्यामुळे पती शेर अस्वस्थ झाला होता. तो स्वतः बेरोजगार होता, त्यामुळे सरकारी नोकरी मिळाल्याने पत्नी सोडून देईल अशी भीती त्याच्या मनात होती. यावरून दोघांमध्ये बऱ्याचदा वादही झाला, रेणूने ही नोकरी करू नये असे त्याचे म्हणणे होते. पण रेणूला नोकरी करायची होती.
अखेर सोमवारी शेरने क्रूर कृत्य करीत पत्नी रेणू खातून हिचा उजवा हात मनगटातून कापला. क्रूर हल्ल्यानंतर तो स्वतःच पत्नीला स्थानिक रुग्णालयात घेऊन गेला. पण डॉक्टरांना हात पुन्हा जोडता येणार नाही, याची त्याने पूर्ण काळजी घेतली होती. कारण, कापलेला काही भाग त्याने घरातच लपवून ठेवला. हे कृत्य करताना त्याच्यासोबत आणखी तीन जण होते. त्यानंतर सर्वजण कागदपत्रे घेऊन पळून गेले. त्या माहिलेला आता सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या कपाळावरही जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेपासून आरोपी आणि त्याचे मित्र फरार आहेत.