मीरठ (उत्तर प्रदेश) – येथील एका शाळेच्या वसतिगृहात बाथरूम अस्वच्छ झाल्यामुळे येथील विद्यार्थिनींचे कपडे उतरवून तपासणी करण्यात आली, असा आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे. या प्रकरणी धमकी मिळाल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र, शाळा व्यवस्थापनाने सर्व आरोप फेटाळले आहेत.
किठौर परिसरातील एका गावातील व्यक्तीने सहा सप्टेंबरला आपल्या मुलीला परिसरातील एका खासगी निवासी शाळेत प्रवेश दिला होता. याच शाळेत त्यांनी आपल्या भाचीलाही १२ सप्टेंबरला प्रवेश दिला होता. १९ सप्टेंबरला भाचीचा त्यांना फोन आला. ती आजारी असल्याचे तिने सांगितले. भाचीला शाळेतून डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर तिने या घटनेची वाच्यता केली, असे कुटुंबियांनी सांगितले.
विद्यार्थिनीची मासिक पाळी सुरू होती. बाथरूममध्ये पाणी येत नव्हते. त्यामुळे बाथरूम खराब झाले. शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थिनींचे कपडे उतरवून तपासणी केली, असा आरोप विद्यार्थिनीने केला. पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितले, की घटनेची माहिती मिळताच मुलीला शाळेतून आणण्यासाठी ते निघाले. पालकांशी फोनवरून संपर्क साधल्यामुळे शाळा व्यवस्थापनाने तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. मुलीचे पालक शाळेत पोहोचलेले असताना इतर पालकही मुलींना आणण्यासाठी तेथे आले होते, असे कुटुंबियांनी सांगतिले. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापनाने मात्र आरोप फेटाळून लावले आहेत.