पनवेल (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फूड डिलिव्हरी बॉयने घरी येऊन खाद्यपदार्थ देताना तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पनवेल शहरामध्ये घडली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पुण्यातही एका डिलिव्हरी बॉयाने असाच प्रकार केला होता. आता या प्रकारामुळे पनवेल शहरात तरुणी आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पनवेल शहरालगतच पनवेलमधील कोन गावाहद्दीत इंडिया बुल्स नावाची इमारत आहे. या ठिकाणी एक शिक्षण घेत असलेली तरुणी मैत्रिणीसह राहते. तिने ऑनलाईन पद्धतीने फूड ऑर्डर केले होते. त्यामुळे फूड डिलिव्हरी करण्यासाठी मोहम्मद रिजवान शेख नावाचा डिलिव्हरी बॉय तिच्या फ्लॅटमध्ये आला. त्यावेळी घरी ती एकटीच होती. त्याने खाद्यपदार्थाचे पार्सल तरुणीकडे सोपवले. तरुणी घरात एकटीच असल्याचे पाहून तिच्या वृक्षस्थळांना स्पर्श केला. त्यावेळी तरुणीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणाने लगेच पळ काढला.
याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा फोटोही समोर आला आहे. या संतापजनक घटनेनंतर पोलीस आता या डिलेव्हरी बॉयचा कसून शोध घेत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विविध बाबींद्वारे या आरोपीचा शोध सुरु आहे.
दरम्यान, गेल्या सप्ताहात पुण्यात एका डिलीव्हरी बॉयने एका तरुणीचे जबरदस्ती चुंबन घेत विनयभंग केला होता. त्यानंतर आरोपी रईस शेख (वय ४०) याला पोलिसांनी अटक केली होती. सदर घटना ताजी असतानाच आता पनवेलमध्येही असाच संतापजनक प्रकार घडला आहे. या डिलीव्हरी बॉयने केलेल्या कृत्यामुळे तरुणी आणि महिलांनी घरी एकटे असताना खाद्यपदार्थ पार्सल मागविणे धोक्याचे ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Crime Food Delivery Boy Young Girl Molestation
Panvel New Mumbai