इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राग हा माणसाचा शत्रू आहे असे म्हटले जाते. रागातून भांडण वाढते, भांडणातून वाद निर्माण होतो आणि त्या वादातून एखाद्या व्यक्तीचे जीवाचे बरे वाईट देखील होऊ शकते असे म्हटले जाते. अनेक वेळा किरकोळ वादातून भांडण इतके विकोपाला जाते की, त्यामध्ये एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. परंतु दोन व्यक्ती भांडत असताना तिसरा व्यक्ती सोडवला गेला तर त्याचे काय होईल? खरे म्हणजे त्यामध्ये त्याची भूमिका वादांमध्ये सामंजस्य घडविण्याची असते. परंतु त्याच्या देखील जिवावर बेतू शकते. अशीच घटना कोल्हापूर मध्ये घडली आणि किरकोळ वादातून झालेल्या भांडणात सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या तिसर्या व्यक्तीला जीव गमवावा लागला.
कोल्हापुरात झालेल्या एका दु:खद घटनेत एका व्यक्तीचा चाकूने जागीच मृत्यू झाला. खरे म्हणजे दोन नागरिकांमधील वाद मिटवण्यासाठी तो माणूस आला होता पण ते इतके चिडले की, त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी त्या तिसऱ्या माणसाच्या पोटात वार केले. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी येथे सकाळच्या वेळी जितेंद्र खामकर आणि विकासनाथ यांच्यात भांडण झाले. पान – सुपारीवर चुना लावण्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. यादरम्यान अनिल रामचंद्र ब्रार (वय ४७) यांना जितेंद्रने घटनास्थळी बोलावले. अनिलने दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांमधील बाचाबाची इतकी वाढली की, विकासने मध्यस्थ असलेल्या अनिलवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. जास्त रक्तस्त्राव झाल्याने अनिलचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विकासला अटक करून तपास सुरू केला आहे. त्यामुळे दोन व्यक्तींच्या भांडणात मध्यस्थ म्हणून पडावे की नाही ? अशी चर्चा कोल्हापूर परिसरातील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.