पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी कलियुगीच्या हैवाण जन्मदात्या बापाला अटक केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा भयानक अमानुष प्रकार सुरू असून अखेर मोठ्या बहिणीने या प्रकरणाची माहिती तिच्या शिक्षिकेला सांगितली, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा व्यवसायाने न्हावी असून तो भाड्याने दुकान चालवत असल्याचे समजते, तसेच आरोपी हा ४५ वर्षांचा असून तो दोन्ही मुलींचा पिता आहे. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींचे वय १६ आणि १५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. लैंगिक छळाच्या आरोपावरून पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचा तपास करत असलेले एस आय दीपक खेडकर यांनी सांगितले की, पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार, लैंगिक छळाची सुरुवात २०१९ मध्ये झाली आणि त्यानंतर अनेकदा हा अत्याचार झाला. मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी शिक्षिका तिच्या घरी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलींच्या मोठ्या बहिणीने तिच्या शिक्षिकेला या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. सध्या आरोपीला १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी दोन्ही मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. त्याचवेळी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.