इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छत्तीसगढमधील बिलासपूरमध्ये एका महिला डॉक्टरचे फोटो एडिट करून व्हायरल करण्याची धमकी मिळाली आहे. महिलेला न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा संशयित आरोपी एक डॉक्टरच आहे. या प्रकरणात महिला डॉक्टरच्या पतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी डॉक्टरचे नाव अशोक दाते आहे. माध्यमांच्या वृत्तांनुसार, २०१७ पासून २०२० पर्यंत महिला डॉक्टर वैद्यकीय शिक्षण घेताना मध्य प्रदेशमधील चित्रकूट येथे होती. त्याचदरम्यान २१ मार्चला कुरिअरच्या माध्यमातून एक पत्र पाठवून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. महिलेचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची मागणी केली होती.
महिला डॉक्टरचे फोटो आरोपी अशोक दाते याने एडिट केले होते असा आरोप आहे. त्यानंतर ते कुरिअरमधून पाठवून धमकावण्यात आले. हे फोटे पाहून महिला डॉक्टर हैराण झाली होती. लाखो रुपयांची खंडणी दिली नाही, तर ३० मार्च रोजी महिलेच्या सासूला हे फोटो पाठवण्याची धमकी देण्यात आली होती.
पीडित महिलेच्या पतीने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिलेचे पती एका रुग्णालयाचे संचालक आहेत. पोलिसांनी या प्रकरणात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.