नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येप्रकरणात पोलिस तपासामध्ये मोठा खुलासा झाला आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे हा सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. याच चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महापालिकेच्या सिडको रुग्णालयात कार्यरत होत्या. 25 जानेवारी, मंगळवारी रात्री नाशिक-मुंबई महामार्गावर मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली होती. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ही हाडे डॉ सुवर्णा वाजेंचीच असल्याचे डीएनए अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
यावेळी सरकारी वकील यांनी माहिती देताना सांगितले की, घटनास्थळी गाडीत चाकू मिळाला आहे. तो चाकू गाडीत ठेवण्याचा उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. डॉ. सुवर्णा वाजेंनी केलेले चॅटिंग मोबाईलमधून उडवण्यात आले आहे. संशयिताचा मोबाईल फॉरेन्सिक टीमकडे डाटा रिकव्हर करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. मोबाईलवरील चॅट का डिलीट केले, याचे उत्तर संशयित देत नाही. त्याच्या मोबाईलमध्ये डॉ. सुवर्णांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सापडला आहे. व्हिडीओमध्ये आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे शब्द वापरण्यात आले आहेत. आरोपीच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपीने दुसरे लग्न करण्या संदर्भात उल्लेख केलेला आहे. दुसरं लग्न करण्यासाठी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खूप मोठा अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढण्यात आल्याचा संशय आहे. पुढील सविस्तर तपासासाठी संदीप वाजे याची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती.
डॉ. सुवर्णा वाजे बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. 25 जानेवारी मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ती हाडे आणि तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, हे तपासण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली होती. त्यात वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली होती. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे 25 जानेवारी रोजी, मंगळवारी सायंकाळीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. यादिवशी बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा फोन पती संदीपलाच केल्याचे समोर आले आहेत. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली आणि मास्टरमाईंड असलेल्या संदीप वाजेलाच बेड्या ठोकल्या. आता त्याचे पाच साथीदारही पोलिसांच्या रडारवर आहेत.