इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीमध्ये वाद होणे ही तशी सामान्य गोष्ट असते, परंतु वादाचे पर्यावसन मोठ्या भांडणात आणि भांडणातून हाणामारी आणि त्यातून एखाद्याचा खून होणे ही भयानक आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. त्यातच एखाद्या पतीने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून करणे ते ही बालकांदेखत हे अत्यंत क्रौर्य आणि निघृण प्रकार म्हणता येईल. या अमानुष प्रकाराला काय म्हणावे? असे अमानुष प्रकार घडणे समाजासाठी अत्यंत घातक आहे खरे म्हणजे ही माणसे नसून हे हैवाणच म्हणता येईल, अशा प्रकारची घटना बिहार मध्ये घडली. गोपालगंज जिल्ह्यातील मीरगंज हद्दीतील कासिम समील गावात सायंकाळी उशिरा परस्पर वादातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला. अंजू देवी (वय ३५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. दाई म्हणून काम करून त्या मुलांचा सांभाळ करत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती विजय साह याला अटक करून चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
प्रथमदर्शनी हे प्रकरण पती-पत्नीमधील वादातून असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर कुटुंबातील इतर सदस्य घरातून पळून गेले आहेत, तर मृताच्या चार अल्पवयीन मुलांची प्रकृती बिघडली आहे. स्थानिक ग्रामस्थ त्यांना समजवण्याच्या प्रयत्नात व्यस्त होते.
या घटनेबाबत मृताची मुलगी पूजाने सांगितले की, सायंकाळी आई पाणी आणण्यासाठी गेली होती. त्याचवेळी वडिलांनी व इतर कुटुंबीयांनी आईचा गळा चिरून खून केला. तिने आणि तिच्या इतर तीन भावंडांनी कसातरी दरवाजा बंद करून आपला जीव वाचवला.
या घटनेसंदर्भात पूजाने आणखी सांगितले की, तिचे वडील विजय साह आणि आई यांचे १० वर्षांपासून भांडण झाले होते. दोघेही वेगळे राहत होते. वडील तिच्या मोठ्या आईच्या सांगण्यावरून वेगळे राहत होते, असा आरोप मुलीने केला आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली नाही. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत होते. आई अंजू देवी काम करायची, त्यातून ती चार मुलांना खाऊ घालायची. घटनेनंतर त्याचे वडील, मोठी आई यांच्यासह सर्वजण घर सोडून पळून गेले. अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी कसेतरी त्या मुलांच्या आईवर अंत्यसंस्कार केले. मात्र अद्याप या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. परंतु तपास सुरू करण्यात आला आहे.