इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आई आणि मुलीचे नाते प्रेमाचे परंतु एखादी आई आपल्या लहान मुलीची हत्या करू शकते यावर विश्वास बसत नाही. परंतु नवी दिल्ली मध्ये अशी अमानुष घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दिल्लीमधील मालवीय नगरच्या चिराग गावात दोन महिन्यांच्या मुलीचा अनन्याचा मृतदेह मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी एक नवीन खुलासा झाला आहे. आरोपी आई डिंपल कौशिक मुलगी अनन्याला डायन मानत होती. अनन्या आपल्या चार वर्षाच्या मुलाला मारेल अशी भीती घरच्यानां वाटत होती. संशयीत आरोपी डिंपलचे वडील हरी ओम हे बुलंदशहरमध्ये तांत्रिक आहेत.
याबाबत तिच्या वडिलांची चौकशी करण्याची तयारी पोलिस करत आहेत. दुसरीकडे पोलिसांनी आरोपी डिंपलला बुधवारी सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर केले, तेथून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
या संदर्भात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, डिंपलने तिची मुलगी अनन्याची दुसऱ्या मजल्यावर हत्या केली. ती दुसऱ्या मजल्यावरील वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत होती. त्यावेळी तिने आधी मुलीचा गळा दाबून खून केला. नंतर मृतदेह फिरत्या वॉशिंग मशीनमध्ये टाकला. काही वेळ मशिनमध्ये मृतदेह फिरवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर तिने मृतदेह पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरूममध्ये नेला आणि लपवून ठेवला. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीबाबत विचारणा केली असता, डिंपल आजारी आहे, तिला सर्दी झाली आहे, ती झोपली आहे, असे सांगत होती.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंपल सुरुवातीपासून तिचे म्हणणे बदलत होती. अनेक तासांच्या सतत चौकशीनंतर तिने मुलीच्या जन्मामुळे नाराज असल्याचे सांगितले. तसेच, तिला असे सतत वाटत होते की, आपली मुलगी डायन जन्मली आहे आणि ती राक्षसी आहे. त्यातून तिने हा अमानुष प्रकार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.