इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही देशात समाज रचना निकोप असावी लागते. परंतु त्यात काही घटक हे अत्यंत गुंतागुंतीचे असतात. त्यात प्रामुख्याने व्यवसायाचा समावेश होतो. भारत आणि त्या शेजारील देशांमध्ये वेश्याव्यवसायात अनेक निष्पाप मुलींना गोवले जाते. प्रामुख्याने बांगलादेशातून भारतात अल्पवयीन मुली आणून त्यांची सर्रासपणे विक्री केली जाते. यासाठी कडक कायदे असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. परंतु एका १७ वर्षीय मुलीला भारतात वेश्यागृहात विकल्याबद्दल एका बांगलादेशी जोडप्याला न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली. ही घटना खुलना जिल्ह्यातील आहे.
एका अधिकृत वृत्तानुसार, खुलना महिला आणि बाल दडपशाही प्रतिबंधक न्यायाधिकरणाने आपल्या निकालात या मुलीला शाहीन शेख आणि अस्मा बेगम या दाम्पत्याने भारतातील वेश्यालयात विकल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावली. याबाबत फिर्यादीने सांगितले की, दोषींनी मुलीला चांगली नोकरी देण्याचे आश्वासन देऊन भारतात नेले आणि १९ ऑक्टोबर २००९ रोजी तिला वेश्यालयात विकले. मात्र, यात कुंटणखान्याचे ठिकाण नमूद करण्यात आले नव्हते. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांना तिचा शोध न लागल्याने त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध सामान्य तक्रार दाखल केली. त्यानंतर, शाहीनने तिला परत मिळवण्यासाठी किशोरीच्या कुटुंबाकडून 20 हजार रुपये मागितले.