रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात पैशासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही? अगदी मेलेल्या माणसाच्या टाळावरची लोणी देखील खाण्याचा प्रकार घडतो असे म्हटले जाते. काही ठिकाणी असे गैरप्रकार घडलेले दिसून येतात, अगदी मेलेल्या माणसांनाही जिवंत दाखविण्याचे प्रकार घडतात, विशेषतः शेतजमीन आणि घर, प्लॉट याबाबतीत असे प्रकार घडताना दिसतात. महाड तालुक्यातही असाच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे या फसवणूक करणाऱ्या व्यक्तींनी चक्क शासनाची नव्हे तर कोर्टाची फसवणूक केली केल्याचे उघड झाले आहे. भूसंपादनाच्या बदल्यात शासनाने न्यायालयाकडे जमा केलेला कोट्यवधींचा मोबदला घेण्यासाठी मृत व्यक्ती जिवंत असल्याचे बनावट कागदपत्रे बनवून न्यायालय व शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. आंबिवली येथील धरणासाठी करंजाडी येथील भूसंपादनातून हा प्रकार घडला असून, महाड न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चार वकिलांसह एकूण दहा जणांविरुद्ध महाड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली.
मधुकर मिरगळ यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार महाड न्यायालयाने दि. ३१ ऑगस्टला याप्रकरणी संबंधित चार वकिलांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा प्रकार सन २०१९ ते २०२२ या दोन वर्षाच्या काळात घडला आहे. सध्या महाड तालुक्यातील आंबिवली येथे होणाऱ्या धरणाच्या कामाकरिता मिरगळ कुटुंबीयांची वडिलोपार्जित जमीन २००५ मध्ये संपादित केली होती. जमिनीचा सुमारे ५४ हजार रुपये मोबदला शासनाकडून करण्यात आला होता. परंतु, त्याचे वाटप झाले नव्हते. मोबदला वाढविण्यासाठी वारसदारांनी महाड येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने २०१७ मध्ये संबंधितांना एक कोटी ३५ लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले. त्यानुसार शासनाकडून २०१९ मध्ये रक्कम न्यायालयात जमा केली. ती मिळविण्यासाठी बनावट कादगपत्रे तयार करून न्यायालयात सादर केले. दगडू मिरगळ हे मृत झालेले असतानाही त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती उभी करून खोटे कागदपत्रे करून त्याआधारे खोटे प्रतिज्ञापत्रही सादर केले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे अधिक तपास करत आहेत. आता या प्रकरणात आणखी काय समोर येते याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
Crime Court Cheating Benefits Documents
Legal Payment