नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – आजच्या काळात कोण कशाने प्रभावित होईल ते सांगता येत नाही. विशेषतः चित्रपटांनी तरुण-तरुणी प्रभावित होऊन त्या प्रकारची वेशभूषा, केशभूषा करतात. सुमारे तीस चाळीस वर्षांपूर्वी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये खूपच हिंसाचार दाखवल्या जात होता, त्यामुळे समाजात हिंसाचार वाढल्याचे मानले जात होते. कालांतराने चित्रपटाचे आशय आणि विषय बदलले. मात्र यापैकी चांगल्या चित्रपटांच्या पासून प्रेरणा घेऊन समाजातील काही तरुण-तरुणी विधायक कार्य करतात, तसेच काही भामटे समाज विघातक कृत्य देखील करू शकतात, यासाठी त्यांना चित्रपटातील वाईट विषय कारणीभूत ठरतो असे म्हटले जाते. दिल्लीमध्ये देखील अशीच एक घटना घडली बंटी आणि बबली या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन एका दाम्पत्याने चोरीचा फंडा सुरू केला होता.
दिल्लीतील इंद्रपुरी येथे राहणारे पती-पत्नी ‘बंटी-बबली ‘ या चित्रपटाने इतके प्रभावित झाले आणि त्यांनी चोरीला धंदा सुरू झाला. ते वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांची फसवणूक करून वस्तू व पैसे लंपास करत होते या दोघा पती-पत्नीला दक्षिण-पश्चिम जिल्ह्याच्या स्पेशल विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आरोपीच्या ताब्यातून हिसकावलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोघांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांनी चेन स्नॅचिंगच्या घटनेत वापरलेली स्कूटीही जप्त करण्यात आली आहे.
पोलीसांनी सांगितले की दक्षिण कॅम्पस परिसरात स्कूटीवर आलेल्या दोघांनी एका तरुणीचा मोबाइल हिसकावून घेतला. पोलीसांच्या पथकाने याचा तपास सुरू केला. यावेळी तपासानंतर या पथकाने गौरव मल्होत्रा (२६, रा. गौरव बुध नगर, इंद्रपुरी) याला दि. २ जानेवारीला अटक केली. यावेळी आरोपीने सांगितले की, त्याची पत्नीही यात सहभागी झाली आहे, त्यामुळे पोलिसांनी त्याची पत्नी पूनम ( वय २३ ) हिलाही अटक केली. एका तरुणीकडून हिसकावलेला मोबाईल गौरवच्या ताब्यातून जप्त करण्यात आला. चार महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाल्याचे आरोपींनी सांगितले. त्याचे कुटुंब अल्प उत्पन्न गटातील असून आता त्यांना समृद्ध जीवन जगायचे आहे आणि बंटी-बबली या बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे शॉर्टकट वापरून श्रीमंत होण्याची त्यांची योजना होती.