इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमात लोक वेडी होतात, नादी लागतात, असे आपण वाचून आहोत. कथा, कादंबऱ्यां, चित्रपटांमध्ये असे प्रेमवेडे असतात. मात्र, प्रत्यक्ष जीवनात प्रेमाच्या वेडापायी एका कंपनीचा एचआर चक्क सोनसाखळीचोर झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. गर्लफ्रेंडवर पैशांची उधळपट्टी करण्याच्या शौकापायी हा पठ्ठा चेनस्नॅचिंग करायला लागल्याच्या घटनेने आग्र्यात चर्चेला उधाण आले आहे.
अभिषेक ओझा असे या सोनसाखळीचोराचे नाव आहे. तो गुरुग्राममधील एका कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. हा आपल्या गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू द्यायचा. नोकरीतून मिळणाऱ्या पगारात गर्लफ्रेंडला गिफ्ट देणे शक्य नसल्यामुळे त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक ओझा हा उच्चविद्याविभूषित आहे. आरोपी हा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याचा पगार जवळपास ४५ हजार रुपये आहे.
गेल्या काही दिवसांत आग्रामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या होत्या. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस रस्त्यांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत होते. यामधील एका फुटेजमध्ये आरोपी दिसला. ऑफिसच्या कामातून मोकळा झाल्यानंतर तो बाईकने आग्राच्या रस्त्यांवर फिरत चेन स्नॅचिंग करायचा. तो महिलांकडील दागिने हिसकावून सोनारांना विकत होता. या दागिन्यांसाठी तो सोनाराकडून भरमसाठ रक्कम घेत होता. त्यातून गर्लफेंडसाठी गिफ्ट विकत घ्यायचा.
दरम्यान, पोलिसांनी अभिषेक ओझाकडून पिस्तुल आणि काडतुसे, दुचाकी, सोनसाखळी जप्त केली. आरोपी लोकांना बंदुकीचा धाक दाखवून लुटत होता.
Crime Chain Snatcher Police Investigation Shocking Info