गोरखपूर (उत्तर प्रदेश) – मुलांवर सुसंस्कार करणे हे पालकांचे म्हणजेच आई-वडिलांचे काम असते. परंतु काही वेळा मुले कुमार्गाला लागतात. त्यांना शिक्षाही करावी लागते. उत्तर प्रदेशात एका मुलाने चक्क कार चोरी करून घरी आणली तेव्हा त्याच्या पित्याने त्याला पोलिसांच्या हावाली केले.
गोरखनाथ परिसरातील तरुणांनी ही कार चोरून घरी आणली होती. हा प्रकार त्याच्या वडिलांना कळताच त्यांना मुलाच्या या कृत्याचा राग आला. त्यांनी स्वतः मुलाला दोरीने बांधले. त्यानंतर डायल 112 नंबरवर पोलिसांना फोन करून पोलिसांना बोलावून मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. आता पोलीस कार ताब्यात घेऊन आरोपींची चौकशी करत आहेत. या गाडीची माहिती त्याच्या मालकाला देण्यात आली आहे.
मोहाद्दीपूर येथील रहिवासी असलेले कार्तिकेयन हे पत्नीच्या उपचारासाठी कारने गोरखनाथ भागातील रुग्णालयात गेले होते. तेथून ते पत्नीसह बाहेर आले तेव्हा परिसरात पार्क केलेली कार गायब होती. त्यांनी पोलीसांना कॉल करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गोरखनाथ पोलिसांनी शोध सुरू केला. तर दुसरीकडे रात्री गुलरीहा येथील जैनपूर गावात राहणारे ओमप्रकाश गुप्ता यांना त्यांचा मुलगा दुर्गेश हा नवीन कार घेऊन आल्याची माहिती मिळाली. तसेच तो मित्रांसोबत दारूच्या अड्डयावर बसलेला दिसला.
तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी दुर्गेशकडे कारबाबत विचारपूस सुरू केली, मात्र त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. त्यामुळे संतापात कुटुंबीयांच्या मदतीने ओमप्रकाश यांनी दुर्गेशला दोरीने झाडाला बांधले. त्यांनी डायल 112 वर कॉल करून सांगितले की, नवीन कार चोरल्यानंतर त्यांचा मुलगा गावात घेऊन आला. कार चोरी करणाऱ्या आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. झडती दरम्यान त्याच्याकडून एक बंदुक जप्त करण्यात आली असून, शस्त्रास्त्र कायद्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.