मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर नाईक यांच्यावर नेरुळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने नाईक यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे नाईक यांना आता अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, नाईक हे पीडित महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नाईक यांच्यापासून या महिलेला एक मुलगाही आहे. पोलिसांकडे तक्रार केली मात्र, त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळेच राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याचे महिलेने म्हटले आहे. या महिलेची नाईक यांच्याशी १९९३-९४ सालापासून ओळख होती. त्यानंतर नाईक आणि या महिलेचे प्रेमसंबंध सुरू झाले. या प्रेमाचे रुपांतर लिव्ह ईन रिलेशनशीपमध्ये झाले. २००४मध्ये या महिलेने मुलाला जन्म दिला. महिला आणि मुलगा दोघांनाही आपल्या सोबत ठेवेन तसेच, मुलगा मोठा झाला की त्याला माझे नाव लावेन, असे नाईक यांनी सांगितल्याचे महिलेने म्हटले आहे.
प्रसुतीसाठी नाईक यांनी मला खास अमेरिकेत पाठवले. बाळ व मला घेण्यासाठी नाईक हे अमेरिकेत आले. त्यानंतर नेरुळ येथे राहण्यासाठी फ्लॅट दिला. मात्र, गेल्या काही वर्षात नाईक यांनी बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले. तसेच, मुलाला नाव देण्याची मागणी केली असता जीवे मारण्याची धमकी दिली, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
आपल्या मुलाची व नाईक यांची डीएनए चाचणी करावी, अशी मागणीही या महिलेने केली आहे.