इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात दोन कुटुंबांमध्ये किरकोळ भांडण झाल्याने त्याचा वाद पोलीस स्टेशन मध्ये गेला. धक्कादायक बाब म्हणजे, एका कुटुंबातील महिला आंघोळ करीत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. आणि पोलिस स्टेशनला घेऊन जाण्यास निघाले. हा सर्व प्रकार पाहून मुलीने पोलिसांना विरोध केला. पोलिसांनी मुलीला मारहाण केली. त्यानंतर या मुलीने आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी एका कुटुंबातील मुलीला त्रास दिल्याने चांदौरा गावातील या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांच्या छळाला कंटाळून आपल्या मुलीने हे पाऊल उचलल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे. या घटनेची माहिती असूनही पोलिस घटनास्थळी पोहोचले नाहीत. रात्री बदायूंमधील बिनावर पोलीस स्टेशन हद्दीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षकासह पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गावातील रहिवासी असलेल्या किश्वरच्या नातेवाईकांचा त्याच्याच कुटुंबीयांशी वाद झाला होता. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलीस ठाण्याने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे. विरोधकांची तक्रार आल्यानंतर एक हवालदार महिला कॉन्स्टेबलसह त्यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्यांची पत्नी अंघोळ करत होती. पोलिसांच्या पथकाने आंघोळ करणाख्या महिलेला ओढून तशाच अवस्थेत नेण्यास सुरुवात केली. मुलीने आडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली.
यानंतर पोलिसांच्या पथकाने पत्नी आणि मुलीला पकडून पोलिस ठाण्यात नेले. शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांना मारहाण करण्यात आली. या घटनेपासून पत्नी आणि मुलगी डिप्रेशनमध्ये असल्याचे किश्वर सांगतात. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी गुलिस्ता हिने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांच्या छळाला कंटाळूनच आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप मृताचा भाऊ सलमानने केला आहे. माहिती मिळूनही पोलिस वेळेवर पोहोचले नाहीत. दोन तासांनी पोलीस स्टेशन पोहोचले आणि त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. बदाऊनचे एसएसपी डॉ. ओपी सिंह म्हणाले, ‘तक्रार प्राप्त झाली होती. तपासात समोर आलेल्या तथ्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. यामध्ये कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला सोडले जाणार नाही.