मुंबई – कर्जाची परतफेड करण्यासाठी विरार येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत त्याच शाखेतील माजी व्यवस्थापकाने लूटमार केली. विरोध करणाऱ्या सहाय्यक व्यवस्थापक महिलेची त्याने थेट चाकूने हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुबे याला अटक केली असून, त्याचा साथीदार फरारी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल दुबे नावाचा संशयित आरोपी संबंधित बँकेचा माजी व्यवस्थापक होता. तो गुरुवारी (२९ जुलै) रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान आपल्या एका साथीदारासोबत बँकेत घुसला. शाखा बंद होण्याची वेळ होती. त्यावेळी काही महिला कर्मचारी उपस्थित होत्या. शटर बंद करून कामे सुरू होती.
दोन्ही संशयितांनी सहाय्यक व्यवस्थापक योगिता वर्तक आणि रोखपाल श्रद्धा देवरुखकर यांना चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि दागिने देण्यास सांगितले. दोन्ही महिला घाबरून पळत असताना इतर महिलांनी आरडाओरड करून संशयितांना रोखण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी दोन्ही महिलांवर चाकू हल्ला केला. गोंगाट ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि संशयितांचा पाठलाग केला. अनिल दुबेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, त्याचा साथीदार फरारी झाला.
योगिता वर्तक बँकेच्या आत रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांची सहकारी गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. दोघींना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी योगिता वर्तक यांना मृत घोषित केले. त्यांच्या सहकारी श्रद्धा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
बँकेतून बडतर्फ
बँकेत लूटमार करणारा संशयित आरोपी अनिल दुबे सध्या नायगाव येथील अॅक्सिस बँकेचा व्यवस्थापक आहे. या घटनेनंतर बँकेने दुबेला बडतर्फ करून आंतरिक चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.