इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे बँकेवर दरोडा टाकण्याचे प्रकारही घडले आहेत. कानपूरमधील कराची खाना येथील सेंट्रल बँकेच्या आणखी चार लॉकरमधून 1.75 कोटी रुपयांचे दागिने चोरीला गेले. आतापर्यंत सात ग्राहकांच्या लॉकरमधून 2.55 कोटी रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने गायब झाले आहेत.
आता या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. पोलिस आणि बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 56 लॉकर्सच्या तपासात चार नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर पोलिसही सक्रिय झाले आहेत. खातेदारांच्या तहरीरवर अहवाल दाखल केला जात आहे. यापूर्वी दोन महिलांच्या लॉकरमधून 50 लाख रुपये आणि एका सीएच्या लॉकरमधून 30 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले होते.
लॉकरमधून चोरीची चौथी घटना पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यात नेले आहे. येथील रहिवासी पंकजकुमार गुप्ता हे किराणा मालाचे काम करतात. सेंट्रल बँकेत त्यांचे 15 वर्षांहून अधिक जुने लॉकर आहे. सोमवारी ते बँकेत गेले होते, मात्र लॉकरची चावी मिळाली नाही. त्यानंतर ते पुन्हा बँकेत पोहोचले. परंतु दुपारपर्यंत बँकेत एकच गोंधळ उडाला.
जनरल मॅनेजर आल्यानंतर गोदरेजच्या तज्ज्ञ टीमच्या मदतीने पंकजचे लॉकर दोन वाजता उघडण्यात आले. लॉकरमध्ये दागिने नव्हते. सायंकाळी 6 वाजता कॅन्टचे रहिवासी विजय आणि वैभव माहेश्वरी यांचे दोन लॉकर्स तपासण्यात आले. एकामध्ये सुमारे 30 लाखांचे दागिने गायब झाल्याचे आढळून आले.
त्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत चाललेल्या तपासात लालबंगला येथील रहिवासी मीना यादव आणि शांतीनगर येथील रहिवासी निर्मला टहलियानी यांचे लॉकरही उघडले. त्यातून मीना यांनी 80 लाख रुपये आणि निर्मला यांनी 35 लाख रुपयांचे दागिने गायब झाल्याची भीती व्यक्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत दोघांनीही तक्रार दिली.