ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा परिसरातील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतून तब्बल १२ कोटी २० लाख रूपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना ९ ते ११ जुलै दरम्यान घडली होती. बँकेच्या कर्मचाऱ्यानेच हा प्रकार केला होता. तपासादरम्यान, टेम्पोमध्ये रक्कम ५ कोटी ८० लाखांची रोकड आढळून आली असून चोरी करणाऱ्या चौघांपैकी तिघांना ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहे.
बँकेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने अन्य तिघांच्या साथीने १२ कोटी २० लाखांची रोकड चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ९ व १० तारखेला बँकेला सुट्टी होती. ११ जुलैला या बँकेमधील सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याचे बँकेच्या लक्षात आले. त्यानंतर संबंधित बँक प्रशासनाने टेक्निकल टीमला संपर्क साधून त्यांना दुरुस्तीसाठी बोलावले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ तारखेला त्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता यातील काही फुटेज डिलीट असल्याचे आढळून आले.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पैसे ठेवण्याची जागा तपासली आणि त्यात ३४ कोटी रुपये गायब असल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार पाहून बँकेच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला. याप्रकरणी स्थानिक मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मानपाडा पोलिसांसह ठाणे मालमत्ता गुन्हे शाखा पोलिसांच्या वतीने देखील या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. मानपाडा पोलिस आणि मालमत्ता गुन्हे शाखेच्या वतीने गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकेही नेमण्यात आली होती.
या प्रकरणात ३४ कोटी रुपयांची चोरी झाली होती. त्यातील १२ कोटी २० लाख रुपये आरोपी घेऊन गेला होता. तर, उर्वरित रक्कम बँकेच्या आवरात आढळून आली होती. अल्ताफने बँकेतील १२ कोटी २० लाख रुपयांची रक्कम चोरल्यानंतर त्याच्या ओळखीच्या इसरार, शमसाद आणि गिरी या तिघांना बोलावून घेतले होते. त्यांच्या टेम्पोमध्ये ५ कोटी ८० लाख रुपये ठेवले. हा टेम्पो मुंब्रा येथे एका ठिकाणी ठेवला होता. सुमारे एक आठवडाभर या टेम्पोमध्ये कोट्यवधी रुपये पडून होते. तर उरलेली रक्कम घेऊन अल्ताफ फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिस कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत याविषयी माहिती मिळाली. त्यानुसार, सोमवारी सकाळी मुंब्रा येथील मित्तल मैदानाजवळ सापळा लावून इसरार कुरेशी याला पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी करुन शमशाद खान आणि अनुज गिरी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचीही कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिघांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या रोकडपैकी ५ कोटी ८० लाखांची रोकड तर १० लाख २ हजार ५०० रूपये किमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अल्ताफ शेख असलेला बँक कर्मचारी मात्र अद्याप फरार आहे.
Crime Bank Employee 34 Crore Fraud Cheating Police